वर्धा - वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पोलीस गस्तीवर असताना लजीज हॉटेल तपासणी दरम्यान झालेल्या वादावेळी एका हॉटेल व्यवसायिकाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामुळे हिंगणघाट शहरात रविवारी (दि. 6 डिसें.) रात्रीचे वातावरण चांगलेच तापले होते. हाजी मिर्झा परवेज बेग, असे मृत व्यवसायिकाचे नाव असून ते माजी नगरसेवक तथा अनेक संघटनेचे पदाधिकारी होते.
नेमके काय घडले
वर्ध्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर लजीज हॉटेल आहे. पोलीस निरीक्षक भानुदास पुदूरकर हे कर्मचारी आरिफ फारुकी यांच्यासोबत रविवारी रात्री 10 वाजता हॉटेल चालू असताना गेले. यावेळी हॉटेल चालकाच्या मुलाशी बाचाबाची झाल्याने त्याला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला आहे. या प्रकारची माहिती मुलाने वडील मिर्झा परवेज बेग यांना दिली. त्यानंतर काही वेळात ते तिथे पोहोचले. यावेळी त्यांची शाब्दिक वाद उफाळला. नुकतेच कोरोनामुक्त झालेले मिर्झा परवेज बेग यांची प्रकृती बिघडून जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याचे बोलले जात आहे.
पोलीस ठाण्यासमोर जमाव, 300 पोलिसांचा बंदोबस्त
सामाजिक कार्यकर्त्याच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच वातावरण तापले. यात एक जमाव हिंगणघाट पोलीस ठाण्याजवळ पोहोचला. जमावातील अज्ञात एकाने पोलीस वाहनावर दडक फेकले. यामुळे वाहनाची काच फुटली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत वर्धा, चंद्रपूर, नागपूर येथील जवळपास 300 अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या आवारात मागवली. यासह शहारातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात करण्यात आले.
पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन तर निरीक्षकाची चौकशी सुरू
जमाव जमल्याचे कळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांची समजूत काढत पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले तर पोलीस निरीक्षकाची चौकशी सुरू केली. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले.
सात दिवसांत चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. यात सात दिवसांचा कालावधी चौकशीसाठी असणार आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी केले.
हेही वाचा - वर्ध्याच्या चिमुकलीला भेटला शिक्षकाच्या रुपात देव! कॅन्सरच्या उपचारांसाठी केली मदत
हेही वाचा - 'सखी वन स्टॉप सेंटर'चा वर्ध्यातील महिलांना आधार