वर्धा : तेलंगाणातील भारत राष्ट्र समितीनं आता महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजी माजी सरपंचांनी एकाचवेळी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश घेतल्यानं इतर राजकीय पक्षांना हादरा बसला आहे. हिंगणघाट मतदार संघातील तब्बल 93 आजी माजी सरपंचांनी भारत राष्ट्र समितीत हैदराबादला जाऊन प्रवेश घेतला आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समिती वर्धा जिल्ह्यात अधिक मजबूत होत असल्याची चर्चा दिसून येत आहे. या आजी माजी सरपंचांनी हैदराबादमध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समितीत प्रवेश घेतल्याची माहिती डॉ. उमेश वावरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश : वर्धा जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी डॉ. उमेश वावरे यांनी मागील तीन महिन्यापासून हिंगणघाट मतदार संघात सभा घेतल्या आहेत. यामुळे 93 आजी माजी सरपंचांना भारत राष्ट्र समितीत सहभागी करण्यात त्यांना यश आलं आहे. एकाचवेळी तब्बल 93 आजी माजी सरपंचांना भारत राष्ट्र समितीनं प्रवेश दिल्यानं हिंगणघाट मतदार संघात भारत राष्ट्र समिती मजबूत झाली आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत या आजी माजी सरपंचांचा हैदराबाद इथं पक्षप्रवेश झाला आहे.
भाजपापुढं भारत राष्ट्र समितीचं आव्हान : हैदराबाद इथं भारत राष्ट्र समितीत प्रवेश घेतलेल्या सरपंचांमध्ये 34 आजी सरपंच तर 59 माजी सरपंच आणि उपसरपंचांचा समावेश आहे. एकंदरीतच वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदार संघात मोठी राजकीय उलथापलट सुरू आहे. शंभर सरपंचांच्या प्रवेशानंतर आता हिंगणघाट विधानसभा मतदार संघांमध्ये भारत राष्ट्र समिती पक्ष आपले पाय मजबूत करताना दिसून येत आहे. भाजपाचे विद्यमान आमदार समीर कुणावार यांच्यापुढे माजी मंत्री अशोक शिंदे यांच्या माध्यमातून आव्हान उभे आहे. त्यात आता अचानक भारत राष्ट्र समितीद्वारे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून आणण्यात येत आहे. त्यामुळे हिंगणघाट विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी आमदारांचा स्वपक्षाला राम-राम : विशेष म्हणजे वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदार संघात दोन दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम करत जिल्हा परिषद सदस्य शरद शहारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर याच हिंगणघाट मतदार संघातून तीनवेळा निवडून आलेले माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. वर्षभरामध्ये मोठे राजकीय फेरबदल हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील विविध पक्षात होत आहेत. त्यामुळे भाजपाच्या गोटात चिंता वाढत आहे. या सर्व राजकीय उलथापलथीत काही दिवसात युवकांची देखील भर पडण्याचं चिन्ह असून वेगवेगळ्या पक्षातील युवक इतर वेगवेगळ्या पक्षाच्या संपर्कात आहेत.