वर्धा - हिवरा तांडा येथील मृत महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी प्रशासनाने जलद हालचाली करत हिवरा तांडा सहित 9 गावाचा कंटेनमेंट झोनमध्ये तर 3 गावांचा बफरझोनमध्ये समावेश केला आहे. यासह काही गावे सील करण्यात आले आहे. 28 पैकी यातील 11 जवळच्या नातेवाईकांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितली.
जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या हिवरा तांडा येथील महिलेला डायरिया झाल्यामुळे तीन खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर सावंगीच्या रुग्णालयात पोहोचताच त्या महिलेला मृत घोषीत करण्यात आले. महिलेचे स्वॅब चाचणीसाठी घेतले होते. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली. या महिलेच्या अहवालानंतर वर्धा जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. यात कंटेंमेंट प्लॅन ऍक्टिव्हेट करून महिलेच्या संपर्कात आलेल्या अनेकांना गृह विलगिकरणासह आयसोलेशनमध्ये हलवण्यात आले आहे. यात थेट संपर्कात आलेल्या 28 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
संबंधित महिला सुरुवातीला वाढोणा येथील दोन खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यांनतर आर्वीच्या साईनगर स्थित एका रुग्णालयात गेली. महिलेला उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यावेळी तिच्यावर प्राथमिक उपचार करून वर्धेला नेत असताना सावंगीला पोहाचताच तिला मृत घोषित करण्यात आले. यानंतर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अंत्यविधी पार पडला. यावेळी देखील घरात 300 लोकांची उपस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे 300 पेक्षा जास्त लोकांना विलगीकरणात ठेवावे लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
शहरात विविध चुकीचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. यासह चुकीचे संदेश हे शेअर करू नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांनी केले. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी गावात जाऊन गावातील नातेवाईक, नागरिकांनी घरात राहूनच लोकांना सहकार्य करा, असे आवाहन जिल्हा प्रशासन करत आहे.