वर्धा - हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील एकाच निवासी शाळेतील ७५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व शाळकरी विद्यार्थी असल्याने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
२४७ विध्यार्थ्यांची अँन्टीजेन टेस्ट
वसतिगृहातील २४७ विध्यार्थ्यांची अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यात बुधवारी ३० तर गुरुवारी ४५ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तर ३० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजून १ विद्यार्थी आणि ९ कर्मचारी अश्या १० जणांचा आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
कोरोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
या सर्व कोरोनाबाधित विध्यार्थ्यांना एका वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ किशोर चाचरकर यांनी दिली. त्यामुळे हिंगणघाट तालुका पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर तर नाही ना? असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा ठाकला आहे.
सावधानता बाळगण्याचे आवाहन
कोरोनाबाधित झालेले सर्व विद्यार्थी १६ वर्षाच्या वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेले विध्यार्थी एकाच वसतिगृहातील आहे. त्यामुळे अन्य विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी भीती न बाळगता सावधानता बाळगावी, कोरोनावर आपण नियंत्रण ठेऊ शकतो, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार दिघे यांनी केले आहे.