वर्धा - घरात कोणी नसताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातील रोख रकमेसह सोन्याचे ऐवज घेऊन लंपास झाले. ही घटना सायंकाळी 5 ते 9 वाजताच्या दरम्यान घडली. घरात अवघे चारच तास नसताना चोरट्याने घरफोडी केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रल्हाद दुब्बानी असे घर मालकाचे नाव आहे. बंद घरांना चोरटे सावज करत असून या घटनेत 7 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
प्रल्हाद दुब्बानी यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. यानिमित्त ते मोठ्या बंधूंकडे गेले होते. मागील तीन दिवसांपासून प्रल्हाद दुब्बानी यांचा संपूर्ण परिवार दिवसा घराला कुलूप लावून जात होता. ते सायंकाळी जेव्हा घरात परतले तेव्हा त्यांना धक्काच बसला. घर आतमधून लावून घेत मागच्या दरवाज्याने चोरट्यांनी पोबारा केला होता. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
लहान कपाटात असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, चेन, हार, नथनी, लॉकेट, चांदीचे दागिने आणि 20 हजार रोख असा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. विशेष म्हणजे चोर कप्प्यात असलेले सोने चोरट्याला न दिसल्याने ते वाचले अन्यथा नुकसानीचा आकडा आणखी वाढला असता.