वर्धा - जिल्ह्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवर दोन भीषण अपघात घडले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे, तर काही अंतरावर असलेल्या नागपूर-चंद्रपूर मार्गावर दुसरा अपघात झाला. यामध्ये १ ठार, तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या तीनही अपघातामध्ये चौघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडकी पोहणा गावाच्या मध्यभागी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडला. यामध्ये दुचाकीस्वार ट्रकच्या मागली चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चंदु चरडे (वय-३५), असे मृताचे नाव आहे, तर सुनिल न्याहरे (वय४०) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
महामार्गावरीलच कांढळी चाकूर फाट्याजवळ वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून लघुशंकेला उतरला. मात्र, तेवढ्यात कंटेनरने गाडीला जबर धडक दिली. यामध्ये चालक जागीच ठार झाला. श्रीकांत गौरकर (वय ३७)असे मृत चालकाचे नाव आहे, तर गाडीमध्ये बसून असलेला गणेश गोतमारे (वय २४) गंभीर जखमी झाले.
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी चौकात दुचाकीस्वार चहा पिण्यासाठी थांबले होते. तेवढ्यात नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिली. यामध्ये रवी बोबाटे (वय २८)जागीच ठार झाला, तर याच स्कॉर्पिओने मालवाहूला देखील धडक दिल्याने चालक सचिन सोनटक्के गंभीर जखमी झाला. दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कच्चेपार गावचे रहिवासी आहे. त्यामुळे गावात शोकळा पसरली आहे.
तीनही अपघात महामार्ग पोलिसांच्या हद्दीत घडले आहेत. यावेळी जखमींना बाहेर काढून तत्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तसेच रात्रीच अपघात झालेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली.