वर्धा- अवैध दारू वाहतुकीच्या प्रकरणात समुद्रपूर तालुक्याच्या गिरड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोरा मार्गावरील साखरा शिवारात दारूची वाहतूक करणारा ट्रक केला. दारू आणि ट्रकसह जवळपास 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
गिरड पोलिसांना नागपूरवरून चंद्रपूरला आयशर ट्रक (क्रमांक सीजी 04 एमटी 4794) अवैधरित्या दारू वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून नाकाबंदी केली. यावेळी पोलिसांनी संशयित ट्रक थांबवून पाहणी केली असता यामध्ये विदेशी दारू आढळून आली.
हिंगणघाटच्या तिघांना अटक
पोलिसांनी आयशर ट्रकमध्ये अक्षय नानाजी पोटफोडे (26, रा. हनुमान वार्ड), कुंदन नामदेवराव खडसे (31, रा. निशानपुरा) जोयाफ खा युसूफ खा(31, रा. हिंगणघाट शास्त्री वार्ड) या तिघांना ताब्यात घेतले. तिघेही आरोपी हिंगणघाट शहरामध्ये राहणारे आहेत. पोलिसांनी 18 लाख 84 हजार रुपये किमती विदेशी दारुचा साठा व 12 लाखांचा आयशर ट्रक जप्त केला. तसेच आरोपी जवळील १५ हजार रुपये किंमतीचे मोबाईलही जप्त केला. पोलिसांनी चौकशी केली असता हा दारूसाठा नागपूरवरून चंद्रपुरला नेत असल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी प्रमोद सोनोने, नरेंद्र बेलखेडे, रवि घाटुर्ले, राहुल मानकर, प्रशांत ठोंबरे, महेंद्र गिरी हे उपस्थित होते.