शिरुर (पुणे) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवारांबद्दल बकरी ईदसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरुर पोलिसांनी एका व्यक्तीला तात्काळ अटक केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष रामदेव जांभळे याने त्याच्या मोबाईलवरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद सणाबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करून जनतेच्या मनात चुकीचा संदेश पसरवला आहे.
मुस्लिम समाजाची बकरी ईदवर असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा शरद पवार यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने संबंध जोडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या पोस्टच्या माध्यमातुन करण्यात आला आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरही लोकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरुर पोलीसांनी जांभळे याला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस करत आहेत.