मुंबई - मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा सुरू झाल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद पडली होती. मात्र आता शनिवार, रविवार असे दोन दिवस सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरण सुरू राहणार आहे. 10 ते 12 एप्रिल या तीन दिवसात खासगी रुग्णालयात लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
…तरच लसीकरण सुरू
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीचा साठा कमी झाल्याने लसी अभावी गुरुवार, शुक्रवारपासून लसीकरण केंद्रे बंद पडली. पालिकेने केंद्र सरकारकडे लसीचा साठा मागितला असला तरी तो 15 एप्रिलला उपलब्ध होणार आहे. या दरम्यान पालिकेला 1 लाख 88 हजार लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. लसीचा साठा उपलब्ध होणार असल्याने पालिका आणि सरकारी रुग्णालयात शनिवारी 10 व रविवारी 11 एप्रिलला लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 10 एप्रिल रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 आणि रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु ठेवण्यात येणार आहे. लस साठा अधिक प्रमाणावर उपलब्ध झाला तर खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
दोन सत्रात लसीकरण
शनिवार 10 एप्रिल रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत पहिले सत्र राहणार आहे. ज्या केंद्रांमध्ये नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असेल अशा लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री 8 वाजेपर्यंत कार्यान्वित राहिल. यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसुतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. रविवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केंद्र कार्यान्वित राहतील. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 48 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत . या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
लसीकरणासाठी लॉकडाऊनमधून सूट
मुंबईत शुक्रवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लसीकरणाला जाणाऱ्या नागरिकांना यामधून सूट देण्यात आली आहे. लसीकरणासाठी मोबाईलमध्ये आलेला संदेश दाखवून त्यांना लसीकरण केंद्रावर तसेच केंद्रावरून घरी जाता येणार आहे.