शिरुर (पुणे) - भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी उपराष्ट्रपती यांच्या वक्तव्याचा शिरुर तालुक्यातील शिक्रापुरातून तीनशे पत्रे पाठवून निषेध व्यक्त केला आहे.
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. त्यावर आक्षेप घेत 'हे माझे चेंबर आहे. तुमचं घर नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी हे लक्षात ठेवावे', असे सभापती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं. नायडू यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
गुरुवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून "जय जय जय जय भवानी.. जय जय जय जय शिवाजी" की अशी घोषवाक्ये पोस्ट कार्डवर लिहून ती पत्रे उपराष्ट्रपतींच्या दिल्ली येथील कार्यालयीन पत्त्यावर ते पाठवण्यात आली आहेत. दरम्यान शिक्रापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करत पुढील काळात छत्रपती महाराजांबद्दल कुणीही बोलले, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, या सगळ्या टीकेनंतर आता व्यंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. सभागृहात रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची फक्त आठवण मी सदस्यांना करून दिली. मी महाराजांचा कोणताच अनादर केला नाही, असं ट्विट व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.