मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 5 हजार 567 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. 20 मार्च ते 04 ऑगस्ट या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचार बंदीचे उल्लंघन करण्याच्या 19 हजार 772 प्रकरणात तब्बल 45 हजार 585 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 7 हजार 866 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून, तब्बल 17 हजार 384 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन, तर 20 हजार 335 आरोपींना जामिनावर सोडले आहे.
लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार दक्षिण मुंबईत 1 हजार 829 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर मध्य मुंबईत 2 हजार 610 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पूर्व मुंबईमध्ये तब्बल 3 हजार 190 गुन्हे दाखल झाले असून पश्चिम मुंबईत 3 हजार 202 आणि उत्तर मुंबईत 8 हजार 791 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्तांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.