जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई संस्थान मंदिर आषाढी एकादशीला प्रथमच बंद राहणार आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला याठिकाणी दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांची मोठी उसळते. परंतु, यावर्षी मुक्ताई मंदिराचा परिसर वैष्णवांच्या मांदियाळीविनाच राहणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याने खबरदारी म्हणून कोथळीतील श्री संत मुक्ताबाई संस्थानाचे नवे आणि जुने मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी घरूनच मुक्ताईची आराधना करावी, असे आवाहन श्री संत मुक्ताबाई संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी याठिकाणी दोन्ही मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. छोटेखानी यात्राही भरते. मात्र, यावर्षी यात्रा भरविण्यात आलेली नाही. आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी पहाटे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा-अर्चा करण्यात आली.
दरम्यान, यावर्षी संत मुक्ताईंचा पादुका पालखी सोहळा देखील पायी वारीने न जाता केवळ 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीत बसने पंढरपूरला गेला आहे. पालखीचा पंढरपूरहून परतीचा प्रवास देखील बसने होणार आहे.