पेण(रायगड)- नवी मुंबईतील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यावरून सध्या आगरी समाज आक्रमक झाला आहे. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सुरुवातीपासून केली जात होती. मात्र, सध्या दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रस्तावाला विरोध करत आगरी समाजाच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहण्यात आले आहे.
आगरी समाजाच्या भावना दुखावल्या
दि. बा. पाटील यांनी 95 गावांच्या शेतजमिनी कवडीमोल भावाने संपादित करण्याला कडवा विरोध करण्यासाठी तीव्र लढा उभा केला. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या न्याय हक्कासाठी सतत आंदोलने, मोर्चे, उपोषणे अशा मार्गाचा अवलंब करून लढवय्या अशी प्रतिमा उभी केली, असे प्रकल्पग्रस्तांचे कणखर बाण्याचे लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देण्याची मागणी येथील जनतेने सुरुवातीपासूनच लावून धरली होती. परंतु काही लोकांनी मध्येच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची नवीनच मागणी पुढे आणून अकारण वाद वाढविला आहे. यामुळे समस्त आगरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परस्पर दि.बा.पाटलांचे नाव नाकारल्याने समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लोकं रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिली.
शरद पवारांनी हस्तक्षेप करावा-
मविआ सरकारचे निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करावा, आणि सिडको संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यास भाग पाडावे; असे गाऱ्हाणे अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी त्यांना घातले आहे. त्यासंदर्भात त्यांनी पत्र लिहले आहे.
आगरी समाजाच्या वतीने पाठविलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. पण आधीच त्यांचे नाव समृध्दी महामार्गाला जाहीर करण्यात आले आहे. आणि नवी मुंबई विमानतळ हे रायगड जिल्ह्यात उभे राहात आहे. येथील प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे येथील विकासाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी प्रदीर्घ संघर्ष केला. म्हणूनच त्यांच्या संदर्भात लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत. तर त्यांचे नाव नव्या पिढीला संघर्षमय वाटचालीचे स्मरण करुन देईल. याकरिता त्यांचे नाव विमानतळास देणं संयुक्तिक ठरणार आहे, असे मतही सूर्यकांत पाटील यांनी पत्रात व्यक्त केले आहे.
आजपर्यंतचा पूर्वइतिहास पाहता राज्यकर्त्यांना आगरी समाजाबद्दल नेहमीच वावडे वाटत आले आहे. त्यांनी समाजावर सतत अन्याय केला आहे. परंतु आता समाज बऱ्यापैकी जागरूक झाला आहे. हे शासनकर्त्यांनी ध्यानात घ्यावे. आणि समाजाच्या भावनांचा विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा.