नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यातील विविध भागांत 603 नवे कोरोनाबाधित आढळले तर जिल्हाभरातून 629 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
जिल्ह्यात, प्रामुख्याने नाशिक शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. शुक्रवारी जिल्ह्यात एकूण 503 कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी यात 603 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 19 हजार 550 वर गेला आहे. शनिवारी जिल्ह्यातील विविध भागात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा 592 वर गेला आहे
नाशिक शहरात सर्वाधिक 13 हजार 278 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. त्याखालोखाल जिल्ह्यातील ग्रामीण भागात 4 हजार 601 कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱया मालेगाव महापालिका हद्दीतही शनिवारी 4 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 493 वर गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात जिल्हाबाह्य 178 कोरोनाबाधित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 14 हजार 45 रुग्ण उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. यात नाशिक शहरात 9 हजार 948 , ग्रामीण भागात 3 हजार 370, मालेगाव 1 हजार 180, तर जिल्हाबाह्य 147 रुग्णांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत नाशिक शहरातील विविध रुग्णालयांत 2 हजार 995, ग्रामीणमध्ये 1 हजार 84, मालेगाव येथे 234 असे एकूण 4 हजार 313 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणे 74.91 टक्के आहे.