मीरा भाईंदर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी पालिकेने ज्या तरुणांची निवड केली होती, ते सर्व तरुण भत्त्यापासून वंचित आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. कोरोनामुळे कॉलेज व उद्योगधंदे बंद असल्याने अनेक तरुणांना हे सर्वेक्षणाचे काम आधार ठरत होते. त्यामुळे अनेक तरुणांनी धोका पत्करत सर्वेक्षणाचे काम केले. या कामाचे पैसे घेण्यासाठी हे तरुण गेल्या एक महिन्यापासून पालिकेच्या आरोग्य विभागात चकरा मारत आहेत.
हे अभियान प्रभावी राबवण्यासाठी पालिकेने पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केला. तर दुसरा टप्पा १२ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण केला. आरोग्य विभागाने सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी पथके तयार केली. तरुणांना रोजगार नसल्यामुळे कोरोनाच्या भीतीच्या वातावरणात देखील अनेक तरुणांनी सर्वेक्षणाचे काम केले. परंतु सर्वेक्षणाचे काम करून एक महिना झाल्यानंतरही काशिमीरा भागातील पेणकर पाडा येथील ३५ ते ४० तरुणांचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. हे तरुण सर्वेक्षणाचे पैसे आरोग्य विभागात मागण्यासाठी गेले असता कर्मचारी टाळाटाळ करत असल्यामुळे अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पालिकेकडून पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली होती. या कामासाठी तरुणांना ३५० रुपये दिले जातील, असे सांगितले होते. तर, आता ९५ रुपये दिले जातील असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु तेही अद्याप दिले जात नाहीत. हे सर्वेक्षण अत्यंत घाईने व कमी दिवसात केले असल्याचे देखील काही तरुण सांगत आहेत. त्यामुळे पालिकेने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणावर संशय व्यक्त केला जात आहे.
पहिल्या टप्प्याचा भत्ता देण्यात आला आहे. पुढील आठवड्यात उर्वरित मानधन देण्यात येणार आहे, अशी माहिती मीरा भाईंदर मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली.