ठाणे - मित्रांसोबत कामवारी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भिवंडी तालुक्यातील शेलार गावालगत असलेल्या कामवारी नदीच्या पात्रात ही घटना घडली . सलमान अंसारी ( वय २० वर्षे रा. खाडीपार, भिवंडी) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत सलमान हा त्याच्या अन्य दोन मित्रांसोबत अंघोळीसाठी शेलार गावाच्या हद्दीतील शारदा विद्यालयाच्या पाठिमागील कामवारी नदीच्या पात्रात मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी गेला होता. मात्र, यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सलमान पाण्यात बुडू लागला. त्याच्या नका तोंडात पाणी गेल्याने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, नदीच्या वाहत्या प्रवाहात तो वाहून गेला आहे.
हेही वाचा - लोकलमधील महिलांची सुरक्षा करणाऱ्या 'महिला होमगार्ड'चीच सुरक्षा वाऱ्यावर
या घटनेची माहिती स्थानिक पोलीस व अग्निशमन दलास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बुडालेल्या सलमानचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. आज पुन्हा सकाळपासून शोध पथकाने मृतदेह शोध मोहीम सुरू केली. मात्र, दुपारपर्यंत सलमानचा मृतदेह सापडला नाही. तर या घटनेने तो राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे .