ठाणे - मुरबाड एस. टी. स्थानकाच्या आवारात जमावासमोर तरुणांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे. जमावासमोर खुलेआम तरुणांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे व विशाल टेकडे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
...म्हणून केली मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड शहरातील नमस्कार मॅरेज हाॅल येथे कपड्यांचा सेल लावण्यात आला होता. त्यावेळी या ठिकाणी २ महिला कपड्यांची पाहणी करत होत्या. तर नारिवली येथील ते दोन तरुण त्या महिलांना कपडे दाखवत असल्याचा व्हिडिओ बनवून तो टिकटॉकवर शेअर केला. या व्हिडिओत एका चित्रपटातील डायलाॅग बोलला जात असल्याचे दाखवले. मात्र आरोपी कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे व विशाल टेकडे यांना हा व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचे समजून त्यांनी त्या दोन तरुणांना गुरुवारी मुरबाड बस स्थानकात गाठून जमावासमोर बेदम मारहाण केली. शिवाय मारहाण करतानाचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मात्र या घटनेमुळे दोन्ही तरुण भयभित झाले होते.
गावकऱ्यांच्या मदतीने गुन्हा दाखल
बस स्थानकात जमावासमोर अमानुष मारहाणीची घटना घडून देखील ते पीडित तरुण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात नव्हते. मात्र व्हायरल व्हिडिओ पाहून नारिवली गावातील गावकऱ्यांनी या तरुणांना आधार देत अखेर ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी मुरबाड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे मारहाणीची घटना पोलीस चौकी समोर घडली होती. मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊन देखील मुरबाड पोलीस अथवा कोणत्याही सामाजिक संघटनेने याची दखल न घेतल्याने मारहाण करण्याचे फावले होते.
आरोपींना शुक्रवारी अटक, शनिवारी सुटका
शुक्रवारी आरोपी कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे व विशाल टेकडे या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. तर शनिवारी न्यायालयात हजर केले असता, तिन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली. मात्र या आरोपीवर कलम 367 ब नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे आण्णा साळवे, दिनेश उघडे व कैलास देसले यांनी मुरबाड पोलीसांना केली. मात्र त्यांनी दिलेली तक्रार पोलीसांनी घेण्यास नकार दिला असल्याचे आण्णा साळवे यांनी सांगितले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे नागरिकांना आव्हान
मुरबाड पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या असून आरोपींवर कठोर कारवाई करणार असून या पुढे कोणीही कायदा हातात घेऊ नये, सार्वजनिक ठिकाणी गदारोळ, अमानुष मारहाण करू नये, नागरिकांनी कोणत्याही धमक्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
आरोपींवर कठोर कारवाईसाठी मंगळवारी ग्रामस्थांचे आंदोलन
पीडित तरुण राहत असलेल्या नारिवली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंगळवारी मुरबाड पोलीस ठाण्यासमोर आरोपींनी तरुणांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पीडित तरुणांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मुरबाड पोलीस करत आहेत.
हेही वाचा - Fake baba : भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली घातला ३२ लाखांचा गंडा