ठाणे - जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पोलीस आणि आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांच्या या कर्तव्य तत्परतेची जाण अमेरिकेत अभियंता असलेल्या एका ठाणेकर तरूणाला आहे. त्याने आणि त्याच्या मित्रांनी पोलीस आणि सफाई कामगारांना फेसशिल्डचे वाटप केले. अभिमन्यू ढोणे असे या तरूणाचे नाव आहे.
अभिमन्यू ढोणे आणि त्याच्या मित्रांनी सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, पोलीस यांच्या संरक्षणासाठी ५०० फेसशिल्डचे वाटप केले. फक्त ठाण्यातीलच नाही तर मुंबई आणि नाशिक येथेही हे फेसशिल्ड देण्यात आले. यासोबतच सिव्हिल रुग्णालयाच्या 15 सफाई कर्मचाऱयांना गणवेशही देण्यात आले.
अभिमन्यू ढोणे, पवन बोले, चिन्मया किसमतराव, सूची जांबवळकर, कृतिका लिंगरकरानी, सुयोग विसपुते(नाशिक) आणि इतर काही मित्र हे सर्वजण कामानिमित्त अमेरिकेत असतात. सध्याची आपात्कालीन परिस्थिती पाहता त्यांना पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱयांच्या धोकादायक कामाची जाणीव झाली. त्यामुळेच त्यांनी फेसशिल्ड आणि गणवेशाचे वाटप केले. तरुणांनी दाखवलेल्या आपुलकीने पोलीस, सफाई कर्मचारी आणि डॉक्टर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.