ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संध्या सिंह ही मारुती हंडे यांच्या सोबत विवाह न करता 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये कोळेगाव मधील एका चाळीत राहत होती. त्यानंतर संध्या हिचे आरोपी गुड्डू शेट्टी बरोबरही प्रेमसंबंध जुळल्याचा संशय मारुतीला होता. यामुळे दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. दरम्यान, शनिवारी २२ एप्रिल रोजी संध्याचा दुसरा प्रियकर गुड्डू घरात असताना संध्या आणि मारुती यांच्यात भांडण झाले. यावेळी गुड्डु आणि संध्याने मिळून मारुतीची हत्या केली.
दोघांना अटक: युवकाची हत्या झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मारुतीच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून संध्या सिंह आणि तिचा दुसरा प्रियकर गुड्डू शेट्टी या दोघांना अटक केली आहे.
‘हाच’ असतो मुख्य उद्देश: 'लिव्ह इन रिलेशनशिप'ला कायदेशीर आधार दिला गेला असला तरी या नात्याचा उपयोग अनेकवेळा चुकीच्या कामांसाठी केला जातो. एका महिला समाजसेविकेच्या म्हणण्यानुसार, एकूण ७५ टक्के 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या नात्यात शारीरिक संबंध आणि फसवणूक हाच मुख्य उद्देश असतो. अनामिक नात्याच्या या प्रवाहात फक्त महिलाच नव्हे तर अनेक वेळा पुरुष देखील आभासी नात्याच्या जाळ्यात अडकून गंडवले जातात. आता यापुढचे पाऊल म्हणजे विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून हा बाजार जोर पकडत असल्याचे दिसून येत आहे. काही विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांनी 'लिव्ह इन रिलेशनशीप'साठी नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विवाह बंधनात अडकण्याऐवजी केवळ 'लिव्ह इन'मध्ये राहण्याकडे हल्लीच्या काळात जास्त पसंती दिली जात आहे.
कायदा काय म्हणतो? समाजातील वाढते लिव्ह इन रिलेशनचे प्रकार पाहून सुप्रीम कोर्टाने २०१३ साली 'लिव्ह-इन रिलेशनशिप'बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. रिलेशनमध्ये असलेले दोघेही पार्टनर दीर्घकाळापासून त्यांचे आर्थिक आणि इतर प्रकारचे व्यवहार आपापसात वाटून घेत असतील, तर या नात्याला 'लिव्ह-इन' म्हटले जाईल, असे कायदा सांगतो. 'लिव्ह-इन रिलेशनशिप'बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना दोघांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे असे नमूद करण्यात आले आहे. रिलेशनशिपमध्ये असताना अपत्याचा जन्म झाल्यास ते नाते 'लिव्ह-इन' मानले जाईल. दोन्ही पार्टनरच्या इच्छेवर शारीरिक संबंध आणि मुल होणे अवलंबून राहील, असे देखील कायद्यात नमूद आहे. केवळ शारीरिक संबंधासाठी एखाद्या महिलेसोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहिल्यानंतर पुरुष त्या महिलेला सोडू शकत नाही. या महिलांच्या अधिकारांचा त्यात समावेश आहे.