ठाणे - पादचारी पुलाचा वापर न करता जीव धोक्यात घालून रेल्वे पकडण्याचा प्रयत्न एका तरुणाने दिवा रेल्वे स्थानकात केला. नशीब बलवत्तर म्हणूनच त्याचा जीव वाचला. अगदी एक सेकंदाचा फरक झाला असता तर त्याला जीवाला मुकावे लागले असते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) हळू जाणाऱ्या रेल्वेमधून या तरुणाने थेट 'ट्रॅक'वर उडी घेतली आणि वेगात लोकल पकडायला गेला. मात्र, त्याच वेळी मोटरमन एम. पी. चावला हे कल्याणकडे जलद लोकल घेऊन जात होते, पुढे काय होणार हे लक्षात येताच, त्यांनी गाडीला ब्रेक लावला, त्यामुळे थोडा वेग कमी झाला आणि या तरुणाला ट्रॅक ओलांडायला वेळ मिळाला. हा तरुण एवढा जीवघेणा प्रकार झाल्यानंतरही शांत बसला नाही, त्याने दुसरी लोकल पकडत प्रवास सुरू ठेवला.
हेही वाचा - ठाण्यात अल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, आरोपी गजाआड
रेल्वे प्रशासनाकडून लोकांना वारंवार जीव धोक्यात घालून ट्रॅक ओलांडू नका, पादचारी पुलाचा वापर करावा, यासाठी सूचना दिल्या जातात, जनजागृती केली जाते. मात्र, तरी अनेक महाभाग त्याकडे दुर्लक्ष करून स्व:तासह इतरांचाही जीव धोक्यात घालतात.