ठाणे - कल्याण पश्चिम परिसरातील एपीएमसी मार्केटमध्ये सायंकाळच्या सुमाराला एका तरूणीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तरूणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सनम करोतीया (वय -२७ रा. उल्हासनगर ) असे मृत तरूणीचे नाव आहे. दरम्यान, या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मृत सनम ही आपल्या दुचाकीने आज सायंकाळच्या सुमारास कल्याण बाजार समितीच्या आवारात मित्रांना भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर काही वेळाने दोन तरुण त्याठिकाणी बाईकवर आले. ज्या ठिकाणी सनम उभी होती तिथे तिला पाहताच दोघांपैकी एका हल्लेखोराने गाडीवरून खाली उतरून सनमवर चाकूने सपासप वार केला. त्यानंतर सनम रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून दोघेही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
दरम्यान, या हल्ल्यात सनम गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून हा हल्ला कोणी व का केला याचा तपास सुरू केला.
यावेळी पोलिसांनी मृत सनमच्या अॅक्टिवा या दुचाकीसह दोन मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलद्वारेच पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला. त्यानंतर तासाभरातच एका संशयित आरोपीला एका अटक केली. बाबू ढाकणे असे आरोपीचे नाव असून दुसऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
मृत तरूणी आणि आरोपी बाबू एकमेकांना वर्षभरापासून ओळखतात. तर आता या महिलेला एपीएमसी मार्केटमध्ये कोणी बोलावून घेतले ? बाबू तिकडे कसा पोहोचला ? आणि त्याच्या साथीदाराच्या मदतीने तिची हत्या का केली ? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली आहे.