नवी मुंबई - वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला वाहतूक पोलिसांनी वाचवले आहे. आज(14 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
हेही वाचा - भांडुपमध्ये शिक्षिकेच्या हत्येतील संशयित आरोपीची आत्महत्या
संबंधित महिला वाशी खाडी पुलाच्या दिशेने जात होती. महिलेचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे, शिवाजी बसरे, विजय तांबे व नागरगोजे यांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर पुलाच्या ग्रीलवर चढून ही महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, संबधित महिलेला पोलिसांनी बोलण्यात गुंतवले. त्यानंतर शिवाजी बसरे व नागरगोजे यांनी महिलेला मोठ्या शिताफीने पकडून बाजूला आणले. पोलिसांच्या प्रसंगवधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही महिला कोपर खैराणे परिसरात राहत असून कौटुंबीक वादातून ती आत्महत्येचे पाऊल उचलत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.