मीरा भाईंदर(ठाणे) - भाईंदर पश्चिम येथे राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात चार दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस धमकी देत असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबत चार दिवस फेऱ्या मारुनदेखील पोलिसांनी माझी दाखल घेतली नाही. महिला पोलीस अधिकारी मनीषा पाटील यांना मला पोलीस ठाण्यातून हाकलून लावले, असा गंभीर आरोप पीडित मुलीने भाईंदर पोलिसांवर केला आहे. तसेच, मानसिक त्रास होत असल्यामुळे ३० जुलैरोजी या पीडित मुलीने जीवाला कंटाळून विष (फिनाईल) पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकीकडे योगेश चौरसिया नामक तरुण २५ तारखेला पीडित मुलीला घेऊन लॉजमध्ये गेला आणि अत्याचार केला, अशी माहिती पीडित मुलीने दिली. तर दुसरीकडे, भाईंदर पोलिसांनी चार दिवसांनंतर हा गुन्हा दाखल केला, त्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी या पीडित मुलीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा केला असल्यास पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करू, असे आमदार जैन यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.