ठाणे - असुविधा, अपुरे डॉक्टर कर्मचारी आणि घाई-घाई मध्ये झालेल्या उद्घाटनामुळे वादात सापडलेले ग्लोबल कोव्हिड रुग्णालय आता आणखी एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आरोपीला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे.
ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल हॉस्पिटल सुरुवातीपासूनच वादात अडकले आहे. ग्लोबल रुग्णालयात टॉयलेट दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका युवकाने बाथरुममध्ये अंघोळ करणाऱ्या युवतीला चोरून पाहिले. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याला रंगेहात पकडले आणि चोप दिला. त्यानंतर मात्र,आरोपीचे सहकारी आणि रुग्णालय कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होऊन एकच गोंधळ उडाला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरला झाला. मात्र, नुकतेच उद्घाटन झालेले हे १००० बेडचे कोव्हिड रुग्णालय महिलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे समोर आले आहे.
कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरू झाला त्यावेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीच तक्रार नोंदवली नाही. रुग्णालयातील असुविधांचे पितळ उघडे पडेल म्हणून तक्रार दाखल केली नसल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, असे प्रकार रोखणे हे प्रशासनाचे काम होते. मात्र, त्यातही प्रशासन फेल झाले. यात भर म्हणून की काय वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हा दाखल करू, अशी माहिती या रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर केळकर यांनी दिली आहे.