ठाणे - नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पतीने पत्नीशी वाद घालून गणेशोत्सवासाठी २० हजार रुपयांची पत्नीकडे मागणी केली. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार कैचीने वार करून गंभीर जखमी केल्याने खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नं. २ येथील ओटी सेक्शन २ परिसरातील एका घरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हानसागर पोलीस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन पतीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत पोलीस तपास सुरु केला आहे. महेंदर चंदानी (वय ३६ वर्षे ) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर पतीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हानसागर शहरातील कॅम्प नं. २ येथील ओटी सेक्शन २ परिसरातील एका बॅरेकमध्ये महेंदर चंदानी हे पत्नी मंंजूसह राहतात. महेंदर हे वाहन चालक असून त्यांच्या पत्नी शिलाईकाम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्रीच्या सुमाराला पती महेंदर याने नवीन गाडी खरेदी करण्यासाठी पत्नीकडे पैशाची मागणी केली. त्या कारणावरून त्यांच्यात वादविवाद झाला. त्यानंतरही पुन्हा पती महेंदर याने त्याच्या भावास गणपतीसाठी २० हजार रूपये देण्यासाठी पत्नी मंंजूूकडे तगादा लावला होता. पत्नी मंजुने सध्या आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगताच त्या गोष्टीचा राग पती महेंदर याला आला. त्याने घरातील शिलाईकाम करण्याच्या कैचीने तिच्या पाठीवर व पोटावर सपासप वार करून तिला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी पत्नी मंजूूने दिलेल्या तक्रारीवरून पती महेंदर याच्याविरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पानसरे करीत आहेत.