ठाणे - काही दिवसांपूर्वी भिवंडीत एक महिला प्रभारी आरोग्य निरिक्षिका मोठ्या नाल्यात सीडीने उतरून पाहणी करतानाचा फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. व्हिडिओची शहानिशा न करताच काही प्रसार माध्यमातून त्या महिलेला अधिकारी म्हणून दाखवत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. मात्र, ही महिला अधिकारी नसून ती प्रभारी आरोग्य निरिक्षिका असल्याची माहिती भिवंडी महापालिका लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी दिली. सुविधा चव्हाण, असे या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्या, प्रकल्पग्रस्तांसह भाजपचे आंदोलन
सुविधा चव्हाण या भिवंडी - निजामपूर महापलिकेच्या सफाई कामगार आणि गेल्याच महिन्यात प्रभारी आरोग्य निरिक्षिका म्हणून रुजू झालेल्या आहेत. ४ दिवसांपूर्वी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात असलेल्या आरिफ उद्यानासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्याची सफाई ठेकेदारांनी व्यवस्थित केली की नाही, हे पाहण्यासाठी चव्हाण सीडीवरून नाल्यात उतरल्या होत्या. नाल्याची पाहणी करीत त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. मात्र, त्यांचा दावाही फुसका बार निघाल्याचे पाहवयास मिळाले असून ज्या नाल्याची पाहणी केली त्याही भागात पावसाचे पाणी तुंबले होते. विशेष पालिका प्रशासनाने अनुभव नसलेल्या ९६ सफाई कामगारांना प्रभारी आरोग्य निरीक्षक आणि मुकादमपदी प्रभारी नियुक्ती गेल्याच महिन्यात केली. ती कालच्या मुसळधार पावसात फोल ठरली असून याला पालिका आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप भिवंडी महापालिका लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी केला.
अनुभव नसताना एखाद्या खोल गटारात उतरणे आरोग्यासाठी धोक्याचे
गटारात उतरून पाहणी करताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कर्मचारी सुविधा चव्हाण यांच्या सासू ८ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनतर वारसहक्क कायद्यानुसार सुविधा त्यांच्या सासूच्या जागेवर सफाई कामगार म्हणून रुजू झाल्या. त्या भिवंडी तालुक्यातील कोळवली गावात कुटुंबासह राहत असून त्यांचे पती पोलीस दलात कार्यरत आहे. गेली ८ वर्षे सफाई कामगार पदावर कार्यरत असताना त्यांनी आरोग्य निरीक्षक पदाचा कोर्स पूर्ण करून डिप्लोमा मिळवला. याच डिप्लोमाच्या आधारे त्यांना सफाई कामगार पदावरून प्रभारी आरोग्य निरीक्षक म्हणून पालिका प्रशासनाने नियुक्ती केली. मात्र, अनुभव नसताना एखाद्या खोल गटारात उतरणे आरोग्यासाठी धोक्याचे असून असे या महिलेने करायला नको होते. कारण काही दुर्घटना घडण्यास पालिका लवकर जबाबदारी घेत नसल्याचा आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे, केवळ प्रसिद्धीसाठी गटारात उतरू नका, असा सल्ला लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी नव्याने पदभार घेतलेल्या प्रभारी आरोग्य निरीक्षकांना दिला.
पुन्हा सफाई कामगारच आरोग्य निरीक्षकपदी..
कोरोनाच्या काळात २५ प्रभारी आरोग्य निरीक्षकांना आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरवल्या नव्हत्या. त्यामुळे, त्यांनी पालिका आयुक्तांकडे सफाई कामगार हा आमचा मूळ पदभार मिळावा म्हणून मागणी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने त्या २५ प्रभारी आरोग्य निरीक्षकांना सफाई कामगार म्हणून विविध प्रभाग समितींमध्ये मूळ पदावर पाठवले. मात्र, शहरातील कचरा व सांडपाणी निचऱ्याचे तांत्रिक अनुभव असलेल्या कामगारांची नेमणूक न करता सफाई कामगारांनाच पुन्हा प्रभारी आरोग्य निरीक्षक पद बहाल केल्याने शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप भिवंडी महापालिका लेबर फ्रंटचे सरचिटणीस संतोष चव्हाण यांनी केला.
या परिसरात येतो पावसात नाल्यांना पूर
दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाले सफाईची पहिल्याच पावसाने पोलखोल केल्याने नाले गटारातील पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात शिरले होते. शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर, आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागातील दुकाने, घरांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे खूपच हाल झाले. तसेच, तीनबत्ती येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला व अन्य वस्तू देखील वाहून गेल्या. तर, भाजीपाला व्यापाऱ्यांनी आपला भाजीपाला वाहत्या पाण्यात टाकून पळ काढला होता. महानगरपालिका हद्दीतील म्हाडा कॉलनी, ईदगाहरोड येथील कामवारी नदीकाठी राहणाऱ्या रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे हाल झाले आहेत.