ठाणे- महापालिका हद्दीतील पाणी पुरवठा जलवाहिनी दुरुस्तीसह इतर कामासाठी शहरातील काही भागातला पाणी पुरवठा २ दिवस बंद राहणार आहे. पालिका हद्दीतील सर्व्हिस रोड, धर्मवीर मार्ग (डी-पॉईंट) या ठिकाणी बीएमसी जलवाहिनीवर जलमापक बसविणे तसेच हाजूरी येथील रॉ वॉटर पाणी पुरवठा बंद करण्याकरिता क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी आज (बुधवारी) सकाळी 9 ते गुरुवारी सकाळी 9 पर्यंत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून बुधवार दिनांक 17 जुलै 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 18 जुलै 2019 सकाळी 9.00 पर्यंत बंगला वॉटर डिस्ट्रिक्ट मधील नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर तसेच गावदेवी वॉटर डिस्ट्रिक्ट मधील बी कॅबिन, दादा पाटील वाडी, स्टेशन परिसर,चेंदणी कोळीवाडा, नागसेननगर, महागिरी, राम मारुती रस्त्यावरील एका बाजूचा भाग व जांभळीनाका इत्यादी भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.