ठाणे - शुक्रवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने भिवंडी जलमय झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून भाजी मंडई जलमय झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल होत आहे. परिणामी भाजी विक्रेत्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे.
तीन बत्ती मार्केट, निजामपुरा, पद्मानगर, जैतून पुरा, मंगल बजार स्लॅब, कमला हॉटेल, कामत घर, बाला कंपाऊंड आणि नदीनाका परिसरातील बहुतांश दुकानांसह घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच संपूर्ण भाजी मंडई जलमय झाली आहे.
शहरातील नालेसफाई नीट झाली नाही. गटारांमधील गाळामुळे पावसाचे पाणी गटारी बाहेरून वाहत आहे. या गंभीर परिस्थितीला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दुकानदारांसह नागरिकांनी केला आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या सीमेलगत शेलार ग्रामपंचायत आहे. येथील नदीनाका परिसरात रात्रभर पडलेल्या पावसाने रफिक कंपाउंड येथील शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.