ठाणे - ग्रामपंचायतीच्या मालकीच्या तलावातील पाण्यावर वीटभट्टी मालकाने बेकायदेशीरपणे डल्ला मारून पाण्याचा उपसा सुरु केल्याचा प्रकार समोर आले आहे. या पाण्याच्या उपशामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे तलावातील वीटभट्टीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी भिवंडी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भिवंडी तालुक्यातील मौजे पिलंझे ग्रामपंचायतीच्या मालकीचा सार्वजनिक तलाव असून या तलावाच्या पाण्यावर स्थानिक शेतकरी उज्वला पाटील, पंडित ठाकरे, अरुण पाटील, अनिल पाटील, बळीराम वाघे आदी २५ ते ३० शेतकरी भेंडी, गवार, वांगी, काकडी, मिरची, कांदे, कारलं, पालक, कोथिंबीर आदी विविध भाजीपाल्याची पिके घेऊन आपल्या कुटूंबाचे गुजराण करत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला प्राधान्याने पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, अनगांव येथील वीटभट्टी मालक यशवंत लक्ष्मण जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या तलावातून इंजिनद्वारे बेकायदेशीरपणे पाण्याचा उपसा करून वीटभट्टी सुरु केली आहे.
वीटभट्टीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने तलावातील पाणी लवकरच संपुष्टात येणार आहे. पाणी आटल्याने आमच्या भाजीपाल्याची शेती देखील नष्ट होणार आहे. त्यामुळे वीटभट्टीसाठी वापरण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करण्यात यावे व आमची भाजीपाल्याची शेती वाचवावी अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.