ठाणे - कुणबी सेनेचे प्रमुख आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अखेर आपल्या हजारो समर्थकांसह काँग्रेसला रामराम ठोकला. येत्या चार ते पाच दिवसांत पुढील रणनीती जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
विश्वनाथ पाटील यांच्या जागी २००९ मध्ये निवडून आलेले माजी खासदार सुरेश टावरे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी दिल्यापासूनच कुणबी सेनाप्रमुख पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते कुणबी सेनेच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेत आहेत. वास्तविक पाहता भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. २००९ मध्ये देखील नव्याने पुनर्रचित झालेल्या सर्वसाधारण २३ भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती. सुरेश टावरे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेसने टावरे यांना उमेदवारी नाकारून विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, विश्वनाथ पाटील यांना सपाटून मार खावा लागला होता. गेल्या निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीमधून कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि मोदी लाटेत निवडून आले होते.
यंदा मात्र, भिवंडी लोकसभा मतदारसंघाला बंडखोरीची लागण झाली असून काँग्रेसविरोधात विश्वनाथ पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या सुरेश म्हात्रे बाल्या मामा यांनी बंड पुकारल्याने खासदार कपिल पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.