ठाणे - शहरात गुरुवारपासून पुढील १० दिवस लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी जांभळीनाका येथील भाजी मंडईमध्ये भाजी घेण्यासाठी गर्दी केली आहे. आधीच कोरोना आणि रोजगारामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, व्यवसाय अडचणीत आले आहेत. या काळातच भाज्यांचे भाव कडाडले आहेत. भाजीचे दर किलोमागे तब्बल २० ते ४० रुपयांनी वाढले आहे. प्रत्येक भाजीत आवश्यक असणारे टोमॅटो हे ७० ते ८० रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पुणे, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढल्याचे व्यापारी सांगतात, तर दुसरीकडे व्यापारी ग्राहकांना लुटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून पगार नाही. तसेच घरखर्च, वीजबिल, आजारपण अशा चारही बाजूने सर्वसामान्य माणूस पिचला आहे. त्यातच भाववाढीमुळे जीव मेटाकुटीला आला असल्याचे नागरिक सांगतात.
गुरुवारी सकाळपासून कडक लॉकडाऊन -
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहे. ठाण्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून पुढील १० दिवसांपर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून बाजारपेठेत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.