नवी मुंबई - परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला आणि पनवेल परिसरात असणाऱ्या स्थानिक मळ्यांंना बसला आहे. यामुळे घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आणि त्याचा परिणाम हा भाज्यांच्या दरावर झाला आहे.
पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात पुणे, नाशिक व्यतिरिक्त अधिक प्रमाणात पनवेल परिसरातील स्थानिक गावातून फळ व पालेभाज्यांची आवक होते. मात्र परतीच्या पावसामुळे या पनवेल परिसरातून येणाऱ्या स्थानिक भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी प्रमाणात झाल्याने दैनंदिन वापरातील 59 भाज्यांपैकी 50 टक्के भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडीचा दर 50 रूपयांवरून 80 वर गेला आहे, तर वांगी 40 वरून 60 रुपये तर फ्लॉवर 70 व कोबी 60 रुपये किलोने विकली जात आहे.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती येथील घाऊक बाजारात ट्रक, टेम्पोमधून येणाऱ्या भाज्यांची दररोज 100 वाहनांची आवक असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत भाज्यांची 30 ते 35 वाहने येत आहेत. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झाला असून ते वाढले आहे. तर पालेभाज्यांचे दर नेहमीपेक्षा 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. स्वयंपाक घर अथवा उपहार गृहात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या टोमॅटोच्या दराची घाऊक बाजारात वाढ झाली आहे. यामुळे टोमॅटो महागला आहे. दरम्यान, केंद्राच्या कृषी धोरणावर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा - ठाण्यातील ग्लोबल रुग्णालय म्हणजे रुग्णांसाठी जीवनदान - आयुक्त डॉ. विपीन शर्मा
हेही वाचा - ठाण्यात एका विचित्र अपघातात १ जण जागीच ठार तर, एक गंभीर जखमी