ठाणे - शहरातील कामे सुरु आहेत, तोपर्यंत खड्डे पडणारच, अशी प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया देऊन ठाकरे यांनी ठाण्यातील सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाची बाजू घेतली आहे.
शहरात खड्डे पडले आहेत, हे जरी खरे असले तरी शहरात कामे सुरु आहेत. कामे सुरु असली तर अडचणी निर्माण होतात. त्या ठिकाणावरुन मोठी वाहने जात असतात. त्याला तुम्ही काहीच करु शकत नाही. त्यामुळे कामे पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ता ठीक होणार नाही. कामे पूर्ण झाली की रस्तेही चांगले होतील, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
आदित्य ठाकरे ठाण्यात गुरुवारी वनस्थळी उद्यानाच्या लोकार्पण सोहळा, आगरी कोळी भवन भूमीपूजन तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी लोकार्पण आणि गायमुख घाट भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शहरातील खड्ड्यांबद्दल विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार प्रताप सरनाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
सध्याच्या घडीला 'जनआशीर्वाद' यात्रा महत्त्वाची नसून आमचे सर्व लक्ष कोल्हापूर आणि सांगली या पूरबाधित भागांकडे असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी पूर ओसरला असला तरी तेथील साफसफाई आणि त्यांना मदत पोहचवणे गरजेचे आहे. त्याला आम्ही अधिक महत्व देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसच्या पोलखोल यात्रेविषयी त्यांना विचारले असता, कोणाची पोलखोल करणार स्वत:ची का?, असा उलट सवाल उपस्थित करुन त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
दरम्यान, ठाण्यातील घोडबंदर रोडवर कार्यक्रमासाठी जात असताना आदित्य यांना अनेक ठिकाणी खड्ड्यातून मार्ग काढावा लागला होता. यावेळी त्यांना वाहतूक कोंडीला देखील सामोर जावे लागले. त्यावेळी पूर्ण घोडबंदर रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी वाहतूक कोंडीसाठी मेट्रोला जबाबदार धरले.