ठाणे - राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना यंदा सर्वत्र साधेपणाने सण साजरे होत आहेत. त्यामुळे नाताळ सणासाठी देखील राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. या सणाच्या निमित्ताने विविध ठिकाणी लोकांना आवाहन करण्यात येत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीने व गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
ख्रिसमस सण एकत्रितपणे साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी, एका तरुणाने शुभेच्छा देण्यासाठी हटके हेअर स्टाईल केली आहे. नाताळाच्या पूर्वसंध्येला त्याने या शुभेच्छांचा मेसेज केसात कोरून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. शंकरकुमार साहू असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील गया जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या तो भिवंडीतील एका खासगी कंपनीत सुपरवायरजचे काम करतो. तो भिवंडीतील हनुमाननगर परिसरात गेली ९ वर्षांपसून राहतो.
कोरोनाच्या काळात सुरुवातीला भिवंडीत प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी त्यानेही लॉकडाऊन काळात केस कोरून विविध प्रकारचे संदेश दिला होता. त्याने गेल्या ९ महिन्यात ९ वेळा डोक्यावरील मागच्या भागातील केसात जनजागृतीसाठी अक्षरे कोरून सकाळ,संध्याकाळ त्यावेळी नागरिकांना कोरोनापासून बचाव कसा करावा असे संदेश देत होता. विशेष म्हणजे 'ई टीव्ही भारत'ने याची दखळ घेत मे महिन्यात त्याविषयी वृत्त दिले होते.
भाऊबीजेलाही बहिणीला दिल्या अशाच शुभेच्छा!
शंकरकुमार याला तीन बहिणी आहेत. त्यापैकी दोघीही बिहार मधील गया जिल्ह्यात राहतात, तर एका बहिणीचे निधन झाले. शंकरकुमार सांगतो की, भिवंडीत वर्षभर काम करत असताना केवळ मूळगावी बहिणीसोबत दिवाळी साजरी करणासाठी मी दरवर्षी जात होतो. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे नोंव्हेबर महिन्यात भाऊबीजेला जाता आले नाही. त्यामुळे आठव्यांदा डोक्यावरील केसात बहिणींना शुभेच्छा देण्यासाठी हॉपी भाईदुज अक्षरे कोरली आणि व्हिडिओ कॉलिंग करून बहिणींचे आशीर्वाद घेतला होता.