ठाणे - उल्हासनगर महापालिकेत नोव्हेंबर २०१९ ला भाजपाला धक्का देत शिवसेना, रिपाई (आठवले गट) आणि टीम ओमी कलानी आघाडीने, शिवसेनेचा महापौर आणि रिपाई (आठवले गट) चा उपमहापौर केला. मात्र वर्षभरात मित्र पक्ष असलेल्या रिपाई आणि शिवसेनेत खुर्चीवरून राजकीय वाद महासभेत रंगल्याचे पाहावयास मिळाले. शिवसेनेच्या महापौर लिलाबाई आशान यांच्या खुर्ची लगतच उपमहापौर भगवान भालेराव यांनी महापौर आसन व्यवस्थेसारखीच हुबेहूब खुर्ची सभागृहाच्या डायसवर आणून ठेवली. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्या खुर्चीला जोरदार आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त केली.
महापौरांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही
आरपीआयच्या उपमहापौराने खुर्चीवरून जो वाद रंगवला हे त्यांना शोभत नाही. शेवटी सभागृहात महापौरांच्या खुर्चीला मान आहे. असे शिवसेनेचे नगरसेवक तथा शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगत, उपमहापौरांनी आपल्या अधिकारात राहून सभागृहाचे संकेत पाळावे, शिवसेना त्यांची दादागिरी सहन करणार नसून त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, असा इशारा दिला.
मी कुणाचाही अपमान केली नाही, त्यांनीच दाखवावे नियम
उपमहापौर भगवान भालेराव यांनी सांगितले की, मी कुणाचाही अपमान केला नाही. असा कुठला नियम आहे की, खुर्ची समान नको म्हणून. काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला असावा, माझी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांशी जवळीक झाल्याने, हा खुर्ची वाद त्यांनीच रंगवल्याचे सांगत आपली बाजू भालेराव यांनी मांडली.
गेल्याच वर्षी भाजपाला दिला होता धक्का
पलिकेवर नोव्हेंबर 2019 पूर्वी भाजपा, टीम ओमी कलानी आणि साईपक्ष (सेक्युलर अलायंस ऑफ इंडिया) या आघाडीची सत्ता होती. या आघाडीकडे 44 संख्याबळ होते. तर शिवसेनेकडे 25, राष्ट्रवादी 4, रिपाई 4 व कॉंग्रेस 1 असे केवळ 34 पक्षीय बलाबल होते. तर सत्तास्थापनेसाठी किमान 40 असा मॅजिक फिगर हवा होता. त्यासाठी ओमी कालानी यांनी भाजपाने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या विश्वासघाताचा वचपा काढण्यासाठी शिवसेने सोबत हातमिळवणी केली. टीम ओमी कालानीच्या 10 नगरसेवकांच्या पाठिब्यांवर शिवसेनेचा महापौर झाला तर रिपाईला उपमहापौर पद मिळाले.
हेही वाचा - घोडबंदर येथे कायमस्वरूपी सुरू होणार आरटीओ उपकेंद्र; पुढील आठवड्यात परिवहनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
हेही वाचा - भाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन साथीदारांवर कोटीच्या फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल