ठाणे - आयुष्यात उंच झेप घेण्याचे ध्येय बाळगणाऱ्या उल्हासनगरातील राम वाधवा या बांधकाम व्यावसायिकाने सॅटेलाईट फोनसह चंद्रावर जमीन घेतल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत, अभिनेता शाहरुख खान, आग्र्यातील एक आसामी यांनी चंद्रावर जमीन घेतल्याचे ऑन रेकोर्ड नोंद आहे. आता त्यामध्ये राम वाधवा हे चौथे व्यक्ती ठरले आहेत.
चंद्रावर जमीन घेण्यासाठी जयपूरच्या एका कंपनीशी साधला संपर्क
काही दिवसांपूर्वी सिनेसृष्टीचे नामवंत अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांनी आत्महत्या केली. त्या घटनेनंतर त्यांनी चंद्रावर भूखंड घेतल्याची बातमीही गाजली होती. त्यांच्यापासून प्रेरित होत बांधकाम व्यावसायिक राम वाधवा यांनीही चंद्रावर जमीन मिळावी, यासाठी जयपूरच्या कंपनीशी संपर्क केला होता. राम वाधवा यांनी एक महिनाभर आधी कागदोपत्रांची पूर्तता केल्यावर गुरुवारी त्यांच्या हाती जमीन खरेदीची पावती मिळाली आहे.
ही जमीन 43 हजार 500 स्केअर फिट अर्थात एक एकर आहे. भविष्याचा विचार करून ही जमीन घेतली असल्याची माहिती राम वाधवा यांनी दिली. तसेच जंगलात, समुद्रात, अवकाशात रीचेबल असलेल्या सॅटेलाईट फोन देखील त्यांनी बीएसएनएलकडून खरेदी केला आहे. त्यासाठी बीएसएनएलला 1 लाख 70 हजार रुपये अदा केले असून आऊट गोईंगसाठी दर मिनिटाला 35 रुपये असल्याचे राम वाधवा यांनी सांगितले.