नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये इनकमिंग गेल्या काही दिवसात पाहायला मिळाले. भाजपमध्ये मेगाभरतीत ऑफरबाबत आतापर्यंत पडद्याआड चर्चा होत होत्या. भाजपच्या मेगाभारतीची ही परंपरा कायम राखत आता शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना स्टेजवरच खुली ऑफर दिली.
आज नवी मुंबईत माथाडी कामगार मेळाव्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच व्यासपीठावर होते. येत्या निवडणूकीत भाजप-सेना महायुतीच येणार म्हणजे येणार, असे विश्वासाने सांगत असताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना ते आधी शिवसेनेतच होते याची आठवण करून दिली. राजकारणात थोडीशी आवक-जावक चालते. त्यामुळे आज तुम्ही सुद्धा आवक-जावक करू शकता, असे मिश्किलपणे बोलत उद्धव ठाकरे यांनी आमदार शशिकांत शिंदेना खुली ऑफर दिली. यावर व्यासपीठावर बसलेले राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी स्मितहास्य केला. उद्धव ठाकरेंच्या या ऑफरवरून मेळाव्यात हशा उमटला.
हेही वाचा - अंघोळीसाठी गेलेल्या तरूणाचा कामवारी नदी पात्रात बुडून मृत्यू
त्यामुळे मिश्कीलपणे का होईना पण, उद्धव ठाकरे यांनी आमदार शशिकांत शिंदेंना अप्रत्यक्ष ऑफर दिली. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या मेळाव्यात माथाडी कामगारांचे प्रश्न, समस्या यावर सर्वच पक्षातील नेत्यांच्या चर्चा तर झाल्याच, पण उद्धव ठाकरेंच्या अप्रत्यक्ष ऑफरमुळे हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला.