ठाणे - टिटवाळा नजीकच्या बल्याणी परिसरात एका पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडून दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयांक सुनील शर्मा (वय १२) व पियुष पवन ओझा (वय १२) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
टिटवाळा नजीकच्या बल्याणी-नांदप रस्त्यावर एका ठिकाणी चाळीचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहे. सतत पडणाऱ्या पावसाच्या पाण्यानीं हे खड्डे भरले आहेत. याच परिसरात गुप्ता चाळीत राहणारे मृत मयांक आणि पियुष हे दोघे दुपारी शाळा लवकर सुटल्यानंतर त्याठिकाणी फिरायला गेले होते. यावेळी दोघेही खड्ड्याच्या बाजूने जात असताना अचानक खड्ड्यालगतची माती सरकल्याने दोघेही खड्ड्यात पडले. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह दुपारी चार वाजताच्या सुमारास बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले. या घटनेचा अधिक तपास कल्याण तालुका पोलीस करीत आहे.
बांधकाम व्यावसायिक व तत्सम व्यक्तीने विविध कारणांसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. कल्याण भागात यापूर्वी काही बांधकामांच्या ठिकाणी लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटना घडूनही बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.