ठाणे - प्लायवूडच्या गोदामातील प्लायवूड अंगावर पडल्याने झोपलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. मुंब्र्याच्या शीळ भागातील डायघर परिसरात ही घटना घडली. मंजू विश्वंभर चौरसिया व रंजू विश्वंभर चौरसिया अशी मृत सख्ख्या बहिणींची नावे आहेत.
विश्वंभर चौरसिया हे आपल्या एक मुलगा व सात मुलींसोबत प्लायवूडच्या गोदामातील घरात राहतात. त्यांच्या घरावरील छप्परही प्लायवूडचे आहे. त्यावर एका कुत्र्याने उडी मारल्याने प्लायवूडचा ढिगारा त्याखाली झोपलेल्या दोन बहिणींच्या अंगावर पडला. या घटनेचा आवाज येताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
दरम्यान, या ढिगाऱ्याचे वजन जास्त असल्याने ढिगारा काढण्यास वेळ लागत होता. या ढिगाऱ्याखाली त्या दोन बहिणी दबल्या होत्या. स्थानिकांच्या मदतीने त्या दोघींनाही कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत डायघर पोलीस अधिक तपास करत आहेत.