ठाणे - कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1वरील बाकड्यावर सकाळच्या सुमारास झोपलेल्या एका तरुणावर अचानक दोन तरुणांनी हल्ला केला. त्यामधील एका आरोपीने चाकूने हल्ला केल्याने या हल्ल्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नारायण असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी संतोष राठोड याला अटक केली आहे. त्याचा साथीदार फरार असून लोहमार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहे. या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अज्ञात कारणाच्या वादातून हत्या -
मृत नारायण भंगार वेचक असून तो कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ वरच्या बाकड्यावर शनिवारी सकाळी साडे दहा वाजल्याच्या सुमारास झोपला होता. अचानक दोन तरुण त्याला झोपेतून उठवून त्याच्याशी कुठल्या तरी अज्ञात कारणावरून वाद घालत होते. हा वाद एवढा विकोपाला गेला की, एका आरोपीने चाकूने नारायण हल्ला केला. या हल्ल्यात नारायणचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर हल्लेखोर लोकलने प्रवास करून पुढे गेल्याचे दुसऱ्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून हत्येप्रकरणी एकाला अटक केली असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल यांनी दिली.
हेही वाचा- 'पप्पा, मला माफ करा' अशी चिठ्ठी लिहून 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या