ठाणे- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र,आता कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयातही कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. महापालिकेतील एक अधिकारी आणि एक शिपाई कोरोनाबाधित आढळल्याने पालिका प्रशासन हादरले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका डॉक्टराला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वीच समोर आले होते. या डॉक्टरचे पालिका मुख्यालयात येजा सुरू होते. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या एका अधिकाऱ्यासह त्याच्या शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे शहरात पसरलेला कोरोना आता पालिका मुख्यालयात पोहोचल्याने आरोग्य विभागासमोर आव्हाने उभी राहिली आहेत.
महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका भूलतज्ञाला कोरोनाची लागण झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यापाठोपाठ महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील कोरोनाचे कामकाज हाताळणाऱ्या डॉक्टरांच्या टीम मधील एका डॉक्टरचा अहवाल मंगळवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान, कोरोनाबाधित डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या 52 अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यातील दोघांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्यासह कार्यालयातील शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या आणि शिपायाच्या संपर्कात मागील पंधरा दिवसात किती जण आले, याचा शोध सुरु आहे. दोघांनाही उपचारासाठी होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.