ठाणे : अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहितेची तिच्या राहत्या घरातच आठ वर्षांपूर्वी गळा चिरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हत्या केली होती. या गुन्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांनीसह तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वीरेंद्र अजय नायडू (तेव्हा वय २२), हा अंबरनाथ महाविद्यालयातील बीकॉमचा विद्यार्थी होता. तर अश्विनी सिंग (तेव्हा वय, २२) ही एमबीएची विद्यार्थिनी होती. तर स्नेहल उमरोडकर असे हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
दोन मित्रांसोबत हत्येचा कट : मृतक स्नेहल उमरोडकर ह्या कुटूंबासह अंबरनाथ शहरात राहत होत्या. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांचा राहत्या घरातच गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. आरोपींचा शोध सुरू केला असता, हत्येप्रकरणी महाविद्यालयात शिक्षण घेणारा वीरेंद्र अजय नायडू, एमबीएसचे शिक्षण घेणारी अश्विनी सिंग, आणि १७ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी अश्या तिघांना अटक केली होती. हे तिघेही आरोपी पोलीस कोठडीत असताना धक्कादायक माहिती समोर आली होती. मृत विवाहिता यांचा मुलगा आदित्य याचा बालपणीचा मित्र असलेल्या मुख्य आरोपी नायडूने त्याच्या इतर दोन मित्रांसोबत हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.
पास होण्यासाठी केली हत्या : मुख्य आरोपी नायडू हा महाविद्यालयात एका विषयात वारंवार नापास होत असल्याने पास होण्यासाठी त्याला लाच द्यावी लागली. मात्र लाच देऊन त्याचे गुण बदलण्यासाठी त्याला रोख रकमेची गरज होती. त्यामुळेच त्याने दोन मित्राच्या मदतीने हत्या केल्याची त्यावेळी पोलिसांना कबुली दिली होती. दरम्यान मुख्य आरोपी नायडू हा मृत विवाहितेचा मुलगा आदित्यचा बालपणीचा मित्र असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. शिवाय आरोपी नायडू हा उमरोडकर कुटूंबाच्या खूप जवळचा असल्याने त्याची मृतकाच्या घरी नियमित ये जा होत असे, खळबळजनक बाब म्हणजे बालपणीचा मित्र आदित्यशी मुख्य आरोपीने गप्पा मारल्या होत्या. दोघांच्या संभाषणाच्या दरम्यान त्याची आई घरी कधी एकटी असेल हे शोधण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांचा ठावठिकाणा त्याच्याशी गुप्तपणे माहिती आरोपीने गोळा केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
धारदार शस्त्राने गळा चिरला : त्यानंतर ठरल्याप्रमाणे हत्येच्या दिवशी तिघे आरोपी हातमोजे घालून उमरोडकर यांच्या घरी येऊन त्यांनी घरातील कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत विवाहितेला बांधून तिचा गळा चिरला. तसेच तिच्या गळयातील मंगळसूत्र घेऊन पळून गेले होते. दरम्यान मृतक स्नेहल ह्या पती विवेक, मुलगा आदित्य यांच्यासोबत राहत होत्या. घटनेच्या दिवशी आदित्य हा मुलुंड येथे नातेवाईकाच्या घरी गेला होता. तर मृतकचे पती विवेक काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यानंतर रात्री ९.१५ च्या सुमारास पती विवेक घरी परतले तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला असता त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिचा चष्मा तुटलेला होता, तोंडाला टेप लावून हात बांधले होते. धारदार शस्त्राने गळा चिरला होता. आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रच गायब होते.
दोघांना जन्मठेप : मृतकाच्या बाजूने भक्कम पुरावे सरकारी वकील सचिन कुलकर्णी आणि संजय गोसावी यांनी पोलिसांच्या सह्कार्याने गोळा करत न्यायालयात आरोपीना शिक्षा होण्यासाठी बाजू मांडली. सोमवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी मुख्य आरोपी नायडू आणि एमबीएसची शिक्षण घेणारी तरुणी अश्विनी सिंग अश्या दोघांना जन्मठेप आणि 5,000 रुपये दंड ,आणि दरोड्यासाठी 10 वर्षे कारावास आणि 2,000 रुपये दंड ठोठावला आहे.