ठाणे : अनलॉक काळापासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनात कमालीची वाढ झाली असतानाच मानपाडा पोलिसांना दोन सख्ख्या भावासह साथीदाराला सीसीटीव्ही फुटेजमुळे गजाआड करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे या चोरट्या त्रिकूटाकडून आतापर्यंत महागड्या ११ चोरीला गेलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. योगेश महेश भानुशाली (वय, ३० रा. कल्याण पूर्व ) मुकेश महेश भानुशाली (वय, ३४ रा. कल्याण पुर्व) आणि यांचा साथीदार समीर उर्फ अक्रम सय्यद असे अटक केलेल्या त्रिकुटाचे नाव आहे.
मिलापनगर, डोबीवली पुर्व भागातील मिलापनगर भागातून एक रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट २७ जानेवारी रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी मानपाडा चोरीचा गुन्हा दाखल होताच मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,.पवार (गुन्हे), सहा पोलीस निरीक्षक सुरेश डावरे, पोलीस हवालदार भानुदास काटकर, संतोष भुंडरे, पोना. प्रतिम काळे, भगवान चव्हाण, दिलीप किरपण, पोलीस शिपाई अनिल घुगे, सुधाकर भोसले, सोपान काकड या पथकाने तपास सुरु केला. आरोपी भानुशाली बंधू पोलिसांच्या तावडीत सापडले.
त्रिकूटाकडून ४ लाख ९० हजार रुपयांच्या ११ बाईक हस्तगत ..
सराईत बाईक चोरटयांनी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ५ बाईक तर कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २ बाईक, आणि विष्णुनगर, हिललाईन, मुंब्रा तसेच नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक बाईक अश्या ११ विविध कंपनीच्या बाईक लंपास केल्या होत्या. हा सर्व बाईकची किमंत पाहता एकूण ४ लाख ९० हजारांचा बाईकसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आणखी काही बाईकचोरीचे गुन्हे या त्रिकूटाकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.