ठाणे - दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून पिस्तुलातून गोळी झाडणाऱ्या दोघा आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. अक्षय पाटील उर्फ शुभी आणि दीपेश उर्फ मामा असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दिवा, स्मशानभूमी परिसरात घडली असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दिवा, आगासन गाव येथे राहणारा दिनेश मुंढे (31) यास 24 मे रोजी रात्री अक्षय व त्याचा साथीदार दीपेश उर्फ मामा या दोघांनी दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावले. तेव्हा, अक्षय याने तक्रारदार दिनेश यास मी डोंबिवलीचा ओरिजनल भाई आहे. फेसबुक भाई नाही, हे दाखवण्यासाठी तुला बोलावले असून तुला इथेच ठोकतो, असे धमकावत पिस्तुलमधून एक राउंड फायर केला. मात्र,सतर्क झालेल्या दिनेशने ती गोळी चुकवली. त्यानंतर दिनेश याने अक्षयच्या हातातील पिस्तुल घट्ट पकडून ठेवले. या झटापटीत आरोपी अक्षय याने त्याच्याकडील पिस्तुलमधून तीन राउंड फायर केले.
पिस्तुलच्या राउंडच्या आवाजाने गावातील नागरिक घटनास्थळी जमा झाल्यानंतर आरोपी अक्षय व त्याचा साथीदार घटनास्थळावरून दुचाकीने पळून गेले. या घटनेनंतर दिनेश मुंढे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याला जात असतांना अक्षय याने फोन करून, आज तु वाचलास, पण तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी दिनेशने मुंब्रा पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि धमकी देणे असा गुन्हा दाखल केली. यानंतर, मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश शिंदे यांच्या पथकाने दोघांना ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह परिसरात सापळा रचून सहा तासात अटकेत घेतले.