ठाणे - पोलीस दलातील दोन जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते, तर जयसिंग घोडके अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते. ते दोन्ही ५३ वर्षीय भाऊ पोलीस दलात सेवा बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यातही जीवाची परवा न करता नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी देवाच्या रुपात हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून अनेक पोलिसांना आपला जीवही गमवावा लागत आहे. त्यातच अंबरनाथमधून आणखी एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस दलातल्या ५३ वर्षीय २ जुळ्या भावांचा ८ दिवसांच्या फरकाने कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - मुंबईच्या आस्माची हजारो ख्वाहिशे ऐसी...फुटपाथवर राहून दहावीत मिळवले यश
विशेष म्हणजे मृतक दोघेही जुळे भाऊ एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. आणि त्यांनी एकत्रच पोलीस ट्रेनिंग देखील पूर्ण केले होते. दिलीप घोडके यांचा २० जुलै रोजी तर जयसिंग घोडके यांचा २८ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.