ठाणे- टायर कंपनीतून प्रक्रिया केलेले विषारी केमिकल ट्रकचालकाने शेलार (मीठपाडा) येथील कामवारी नदीच्या नाल्यात सोडले आहे. नदीचे प्रदूषण केल्याने ट्रकचालकासह त्याच्या साथीदारावर भिवंडी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना मंगळवारी दुपारी गजाआड केले आहे. चालक मोहम्मद अयुब खान (वय45) व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव (वय35) असे केमिकल प्रदूषण प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
ट्रक चालक मो. याकूब हा वाडा तालुक्यातील मौजे डाकिवली येथील सन रबर या टायर कंपनी व्यवस्थापनाच्या निर्देशाने गेल्या अनेक महिन्यांपासून टायरवर प्रक्रिया केलेले घातक केमिकल टँकरमध्ये भरून रात्रीच्या वेळेत ते मीठपाडा येथील नाल्यात सोडत होता. त्यासाठी पानपट्टी चालक चंद्रप्रकाश हा काही पैश्यांच्या मोबदल्यात त्याला मदत करत होता. मात्र काल रात्री केमिकलने भरलेला टँकर नाल्यात खाली करत असताना परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या घशाला खवखव व श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी या घटनेचा शोध घेतला असता मीठपाडा येथील तबेल्यालगतच्या नाल्यात घातक केमिकलने भरलेला टँकर खाली होत असल्याचे दिसून आले. भयभीत झालेल्या नागरिकांनी या घटनेची खबर तात्काळ भिवंडी तालुका पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक वैभव देशपांडे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन केमिकलने भरलेला टँकर ताब्यात घेऊन चालक मोहम्मद अयुब खान व त्याचा साथीदार चंद्रप्रकाश यादव यांना अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.