ठाणे - माफियांनी वालधुनी नदीत टाकाऊ विषारी रसायन सोडले आहे. त्यामुळे विषारी वायू निर्मिती होऊन नदीलगतच्या रहिवाशांनी मध्यरात्री भीतीने पलायन केले आहे. उशीरापर्यंत लोक विषारी वायूबाधेने घुसमटत होते. मध्यरात्री विषारी वायूची तीव्रता अंबरनाथमधील शिवमंदिर परिसर व उल्हासनगर पूर्वेकडील भरतनगर, समतानगर, कैलास काॅलनी, कुर्ला कॅम्प, दहा चाळ या भागात अधिक होती. उल्हासनगरमधील सुभाष टेकडी भागातील काही सामाजिक कार्यकत्यांनी आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी पाण्याची फवारणी करून घेतली, तरी देखील वासची तीव्रता कमी झाली नाही. या वासाची उग्रता खूप जास्त असल्याने कैलास कॉलनीत नागरिकांना डोळे जळजळ करणे, श्वास घेण्यास त्रास, मळमळ होणे, डोके दुःखत उलट्याही झाल्याचे समोर आले आहे.
क्रूरपणे लोकांच्या जीवाशी खेळ
उल्हासनगर कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले की अशी घटना पहिल्यांदा घडत नाहीये. घटना घडली की यंत्रणा धावते मात्र मूळ गुन्हेगारांपर्यंत पोहोचत नाही. सर्वसामान्य लोक साटंलोटं असल्याचा आरोप करत आहेत. उल्हासनगर व अंबरनाथच्या सीमेवरील वडोल, एएमपी गेट, लासी पाडा, रेणुका सोसायटी, सम्राट अशोकनगर, लालचक्की या परिसराला विषारी वायुचा त्रास नवीन नाही. या भागात सर्व नियमकायदे धाब्यावर बसवून कंपन्या सुरू आहेत. त्यांचे प्रदुषण हा या भागातील लोकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. लोक विषारी वायु शोषून घेत जगत राहतात. डोकं दुखतं, डोळे चुरचुरतात, पण सांगणार कोणाला ? असा सवाल साळवे यांनी उपस्थित करून स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याचे त्यांनी सांगितले.
वालधुनी नदीला लागले प्रदूषणाचे ग्रहण
ज्या नदीत व्हॉल्व्ह धुतले जायचे, त्याच वालधुनी नदीत टँकरद्वारे टाकाऊ केमिकल सोडण्याचे काम सुरू झाले. या कामात उल्हासनगर आणि अंबरनाथचे असंख्य टँकरमाफिया कार्यरत आहेत. दिवसा 20 ते 25 टँकर वालधुनी नदीत सोडले जातात. हे टँकर अंबरनाथचे वडोल गाव, पवईचा पूल, खन्ना कम्पाउंडजवळचा पूल, स्मशानभूमीजवळचा पूल, नदीच्या किना-यावर विशेष म्हणजे काजल पेट्रोल पंप आणि डॉल्फिन हॉटेल परिसरात उभारण्यात आलेल्या प्रशस्त शेडमधून टँकर सोडण्यात येतात. प्रत्येक टँकरमागे माफियांना कारखानदार ३० ते ५० हजार रुपये देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच वालधुनी नदीला लागलेले प्रदूषणाने ग्रहण सुटता सुटत नाही.
हेही वाचा - महाराष्ट्रात 'बर्ड फ्ल्यू'चा शिरकाव.. परभणीत ८०० कोंबड्या दगावल्या, मु्ख्यमंत्री घेणार आढावा