ठाणे - डोंबिवलीतील सीकेपी बँकेला ३० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याला रामनगर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशाने त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली होती. वाघ कारागृहात शिक्षा भोगत असताना आजारी पडला होता. त्यामुळे कारागृह प्रशासनाने त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - आमदार प्रताप सरनाईक रिक्षा चालवतात तेव्हा...
डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघला रामनगर पोलिसांनी १८ नोव्हेंबरला अटक केली होती. मृतक वाघ याच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्याला अगोदर १ दिवसाची आणि त्यांनतर ५ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दिले होते. त्यातच त्याची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने पुन्हा न्यायालयात हजर करणार होते. मात्र, २४ नोव्हेंबरला सकाळच्या सुमाराला लघुशंकेचा बहाणा करून ठगसेन वाघने पोलिसांच्या कोठडीतून धूम ठोकली होती. यामुळे रामनगर पोलिसात खळबळ उडाली होती. पोलिसांनी रेल्वे, बस स्थानक, विमानतळावर वाघला पकडण्यासाठी सापळा रचला असता त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजल्याचा सुमाराला मुबंई विमानतळावरून त्याला अटक केली होती.
हेही वाचा - नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार, युवकांचा लक्षणीय सहभाग
त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाल्याप्रकरणी त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांनतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगीचे आदेश दिले होते. तेव्हापासून तो आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी आजारी पडल्याने त्याला कारागृह प्रशासनाने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा - डोंबिवलीत अज्ञात व्यक्तीने 'सेल्फी पॉइंट'ला लावली आग; उद्धव ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्घाटन
बँकेच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात जगदीश वाघ याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. वाघ याने बँकेची कोणतीही परावानगी न घेता परस्पर रिकामे घर विकले. त्यामुळे बँकेने कर्ज वसुलीसाठी वाघ याला अशाप्रकारे घर विकता येत नाही, असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीकेपी बँकेच्या तक्रारीनुसार बँकेचे मोठे कर्जदार विकासक जगदीश वाघ याला १८ नोव्हेंबरला रात्री घरातून अटक करण्यात आली होती.
वाघने कसा लावला होता बँकेला चुना
सीकेपी बँकेवर मे २०१४ पासून आर्धिक निर्बंध आरबीआयने लागल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. बँकेत जास्त ठेवीदार व खातेदार ज्येष्ठ नागरिक आहेत. जगदीश वाघ याला २०१२ साली कर्ज दिले होते. त्यावर आज घडीला व्याजासहित सुमारे ३० कोटी रूपये बँकेचे कर्ज झाले होते. जगदीश वाघ विकासक म्हणून डोंबिवलीत प्रसिद्ध असून त्याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दाखल आहे. अनधिकृत बांधकामे केल्याच्या कल्याण डोंबिवली महापालिकेनेही तक्रारी केल्या असून वाघ याच्या विरोधात पालिकेच्या न्यायालयात एमआरटीपी खाली खटले सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.