ठाणे - मुंबई लगतचे ठाणे शहर हे एक अद्यावत शहर आहे. या शहरात मुंबईतील 30 ते 40 टक्के लोकांनी स्थलांतरण केले आहे. त्यामुळे, ठाणे शहर हे आजच्या स्थितीला एक गजबजलेले शहर असेच चित्र आहे. ठाण्याची लोकसंख्या ही 25 लाखांच्या पार गेलेली आहे. ठाण्यात ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. ठाण्याच्या ठराविक भागात राहणाऱ्या ख्रिस्ती बांधवांना दफनभूमीची जागा अपुरी पडत आहे. तर, दुसरीकडे मुस्लिम बांधवांनाही जागेचा अभाव आहे.
जागेसाठी संघर्ष करावा लागतो की काय?
माणूस आयुष्यभर संघर्षच करीत असतो. मात्र, मरणानंतर त्याला मुक्ती मिळते, असे म्हणतात. पण, वास्तव असे आहे की, हयात असताना प्रॉपर्टी, मालमत्ता आणि उदरनिर्वाहासाठी संघर्ष सुरू असतो. तर, मरणानंतरही दोन गज जमीन दफन करण्यासाठी कब्रस्थानमध्ये मिळत नाही. येणाऱ्या काळात मारणानंतरही दफन करण्यासाठी लागणाऱ्या जागेसाठी संघर्ष करावा लागतो की काय? असा प्रश्न ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवाना भेडसावत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे कब्रस्थान कमी पडण्याची शक्यता
ठाण्यात अनेक हिंदू स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी मृतदेह जाळण्यात येतात. मात्र, मुस्लिम आणि ख्रिस्ती समुदायात मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे. काही काळाने वाढत्या लोकसंख्येमुळे दफन करण्यासाठी कब्रस्थान कमी पडतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, मुस्लिम बांधव आणि ख्रिस्ती बांधव ठाणे पालिका आयुक्त आणि सरकार यांना साकडे घालीत आहेत. दफणभूमीची त्वरित व्यवस्था करावी. कोरोनाच्या काळात जागेच्या संघर्षाने भविष्यातील दफनभूमीच्या संघर्षाचे संकेत दिल्याचे मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधव सांगतात.
वाढत्या लोकसंख्येमुळे अस्तित्वात असलेली दफनभूमी अपुरी
ठाण्यात ख्रिस्ती दफनभूमी अपुरी पडत आहे. तर, मुंब्रा आणि राबोडी परिसरात असलेल्या दफनभूमीही अपुऱ्या पडत आहेत. कारण, ठाण्याचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येत मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांची मोठी संख्या आहे. त्यामुळे, अस्तित्वात असलेली दफनभूमी अपुरी पडत आहे. जवळपास दफनभूमीची व्यवस्था करण्याची विनंती ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - गर्दी जमविणाऱ्या भाजपाच्या 2 पदाधिकाऱ्यांसह डी मार्टवर गुन्हे दाखल
मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहूल परिस्थिती आहे. तर, कळवा परिसरातही मुस्लिम लोकसंख्या वाढलेली आहे. मात्र, कळव्यात कब्रस्थान नाही. राबोडी हा देखील मुस्लिम बहूल परिसर आहे. तर, मुस्लिम नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात ठाण्यात आणि घोडबंदर रोड परिसरात वाढत आहे. त्यामुळे, ठाणे किंवा घोडबंदर रोडवरील मुस्लिम नागरिकही राबोडी किंवा मुंब्रा येथील कब्रस्थानमध्ये येतात. निश्चित मर्यादेच्या अगोदरच कबर खोदावी लागते, त्यामुळे दफनभूमीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
कळवा, मुंब्रा ते शीळ फाटा असा मोठा परिसर मुस्लिम समुदायाचा आहे. कोरोना वाढल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. मृत्यूनंतर मुक्तीसाठी दफनभूमी अपुरी पडल्याचे वास्तव समोर आले आणि भविष्यात ही गंभीर समस्या असल्याचे मुस्लिम समुदायाने सांगितले.
दोन्ही धर्मांच्या जागेसाठी अडचण
मुस्लिमांपेक्षा ख्रिस्ती बांधवांची समस्या काही वेगळी नाही. अपुऱ्या दफनभूमीमुळे ख्रिस्ती समुदायाला काही मृतदेह दफन करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव परंपरेला बगल देत जळवावे लागते. ठाण्यात ख्रिस्ती समुदाय हळूहळू वाढत आहे. मात्र, दफनभूमी निर्धारित आहे. बऱ्याच गरीब कुटुंबांना शिवडी येथे दफनभूमीकरिता जाणे परवडत नाही. आणि दुसरीकडे ठाण्यातील स्मशानभूमीत दफन भूमीत जागाच उपलब्ध नाही. अशा अवस्थेत काय करायचे, हा मोठा प्रश्न मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांपुढे उभा आहे. तर, भविष्यात ही एक मोठी समस्या असणार आहे. पालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी, महापौर, जिल्हाधिकारी यांनी त्वरित याची नोंद घेऊन दफनभूमीची व्यवस्था करावी, अन्यथा या दोन्ही समाजातील लोकांना मृत्यूनंतरही जागेसाठी तिष्ठत आणि संघर्ष करावा लागणार आहे.
हेही वाचा - भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना अटक