ठाणे - कोरोनामुळे अनेकांच्या व्यवसायावर आर्थिक संकट आले असून थिएटर मालकांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच गेली 5 महिने सिनेमागृहे बंद असल्याने मालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारने थिएटर पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, या मागणीकरीत ठाण्यातील थिएटर मालकांनी अनोखे आंदोलन छेडले आहे.
कोरोनामुळे नाही तर आम्ही उपासमारीमुळेच मरू, अशी भावना यावेळी मालकांनी व्यक्त केली. नियमावलीनुसार सिनेमागृहे सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी दिग्दर्शक तसेच सिनेमागृह मालक विजू माने यांनी केली.
गेली अनेक दिवस एकेरी पडदा चित्रपटगृह मालक देशोधडीला लागले आहेत. दुकाने उघडी झाली, मॉल उघडण्यात आले आहेत. प्रत्येक 'अनलॉक'च्या वेळी आश्वासन दिले जात असून सरकारच्या नियमांचे पालन करून सिनेमागृहे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. चित्रपटगृहे सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देत असून देखील याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला.
हेही वाचा - 'वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारा'चे प्रस्ताव धुळीत
ठाण्यातील वंदना सिनेमागृहा बाहेर हे आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक फलक हातात घेऊन चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत सरकारला विनंती करण्यात आली. 50 टक्के आसन व्यवस्था सुरू ठेवून योग्य ती काळजी घेतली जाईल. सरकारने याबाबत येत्या काही दिवसात निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी चित्रपट मालक, दिग्दर्शक विजू माने यांनी दिला.